सांगली : जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील शिक्षकाने मुलीच्याबरोबर गैरवर्तन केले आहे. त्याशिक्षकावर कडक कारवाई करावी अन्यथा शाळा बंद करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
सांगलीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या एका शिक्षकाने शिक्षक पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार केला आहे. जिल्ह्यातील पूर्व भागात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांने मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला आहे.
इयत्ता सातवी वर्गातल्या मुलींच्या सोबत या शिक्षकाने अश्लील भाषेत संभाषण केल्याचे समोर आले आहे. या शिक्षकाकडून मुलींच्या बाबतीत असभ्यवर्तन सुरू होते. तसेच शिकणाऱ्या एका मुलीला या शिक्षकाकडून थेट "तू माझ्या बायको सारखी दिसतेस"असे बोलत तिचा विनयभंग देखील केल्याचा प्रकार घडला होता.
शाळेतला या शिक्षकाकडून अश्लील कृत्य सुरूच असल्याने संबंधित काही विद्यार्थिनींनी गावातल्या ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांना याची माहिती दिली. नंतर महिला ग्रामपंचायत सदस्यांनी शाळेमध्ये धाव घेऊन मुख्याध्यापकांना याबाबतची माहिती दिल्यावर मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रकार केला.
तसेच शाळेमध्ये असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा करत तसे पत्र ग्रामपंचायतला दिले आहे. त्याचबरोबर मुलींच्या बाबतीत असे प्रकार घडू नये म्हणून महिला व किशोरवयीन मुली संरक्षण समिती गठीत करण्यात आल्याचे सांगितले आहे.
अश्लील कृत्याची माहिती समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीची बैठक देखील घेतली. ज्यामध्ये संबंधित शिक्षकाला बोलवून घेण्यात आले होते. यावेळी या शिक्षकाला जाब देखील विचारला होता.
त्यावेळी शिक्षकाने आपली चूक झाली आहे. आपल्याला एक वेळ माफ करावी, अशी हात जोडून विनंती केली. मात्र शिक्षकाचा हा प्रकार माफी लायक नसून गंभीर असून भविष्यामध्ये अन्य मुलींच्या बाबतीत असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्षकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Post a Comment