संगमनेर : गुंजाळमळा, निमज (ता. संगमनेर) येथील दलित कुटुंब 'मुकेश दिनेश अडांगळे' यांच्या झोपडीला आग लागून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. ही माहिती आधारचे शिलेदार श्रीकांत बिडवे, अरुण जाधव सर व संतोष शेळके, बाळासाहेब खताळ यांना समजली. त्यांनी तात्काळ प्रत्यक्ष निमज येथे जाऊन अडांगळे परिवाराला भेट देत नुकसानीची पाहणी केली.
घरातील किराणा, धान्य, सर्व अंथरूण- पांघरून, इतर वस्तू जळून खाक झाले. शाळेत शिकणारी अकरावी, आठवी, सातवी व पहिलीच्या मुलांचे दप्तर व इतर शालेय साहित्य जळून नष्ट झाल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न तयार झाला होता. आधार सदस्य श्रीकांत बिडवे, संतोष शेळके यांनी संपूर्ण परिस्थिती समजून घेत आधार फाऊंडेशन संगमनेर संस्थेला माहिती दिली.
या घटनेची तीव्रता व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तयार झाल्याने तात्काळ कार्यवाही करत आधारच्यावतीने किराणा साहित्य, अंथरुणासाठी सतरंज्या, पांघरण्यासाठी कांबळे, धान्याचा एक कट्टा तसेच शाळेत शिक्षण घेत असलेल्या चारही मुलांना शालेय दप्तर, सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
याप्रसंगी निमज ग्रामपंचायतचे उपसरपंच अरुण गुंजाळ,आधारचे समन्वयक डॉ. महादेव अरगडे, सोमनाथ मदने, श्रीकांत बिडवे, संतोष शेळके आदी उपस्थित होते.
श्रीकांत बिडवे यांनी सदर घटनेबद्दल माहिती सांगून आधारच्या मदतीबद्दल आभार मानले. संगमनेर शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, उपसरपंच अरुण गुंजाळ यांनीही आधारच्या सामाजिक कामाचे कार्याचे कौतुक केले.
आधारच्या शैक्षणिक, सामाजिक शैक्षणिक योजना, जळीत कुटुंबाला मदत करण्याची आधारची संवेदनशीलता याबद्दल समन्वयक सोमनाथ मदने यांनी माहिती दिली. गरजू कुटुंबाला अत्यंत उपयुक्त साहित्य व शैक्षणिक मदत मिळाल्याबद्दल निमज ग्रामस्थ व अडांगळे परिवाराने मनापासून आभार व्यक्त केले.
Post a Comment