नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाने फार काही फरक पडणार नाही. नवीन चिन्हं घेऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व्यक्त केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतरच्या वातावरणाची जणू काही हवाच काढली आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय अनुभवी व मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेला अतिशय महत्त्व असते. त्यामुळे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे.
विशेष म्हणजे ठाकरे गटाला नवा उमेद देण्यासाठी ही प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाचं उदाहरण दिले आहे.
हा तर निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर चर्चा काही करता येत नाही. त्याने फार काही होत नसतं. मला आठवतं काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि इतर हा वाद झाला. त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी खूण होती. पण ती बैलजोडी निवडणूक आयोगाच्या निकालाने गेली.
पण काँग्रेसने त्यावेळी हात चिन्ह घेतले. ते चिन्ह लोकांनी मान्य केले. त्यामुळे त्याचा फार काही फरक पडत नाही. तसेच शिवसेनेच्या बाबतीत लोक नवे चिन्ह मान्य करतील. ही चर्चा महिनाभर चालेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा अनपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की 21 फेब्रुवारीपासून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय देतील. असं असताना एवढी घाई का केली?, हे कळायला मार्ग नाही.
निवडणूक आयोगाने निकाल दिलेला असला तरी माझं असणं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे वरच्या कोर्टात जातील आणि त्यांच्याकडे न्याय मागतील. त्रयस्थ नागरिक म्हणून माझं मत आहे की, महाराष्ट्रातील शिवसैनिक हा जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा त्यांच्याच पाठिशी उभा राहिल आणि त्यांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून देतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Post a Comment