मुंबई : लोकशाहीचा हा विजय आहे. हा घटनेचा विजय आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे. त्यांचा संकल्प आणि विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केले. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो, अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना बहाल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर युक्तिवाद सुरु होता. अखेर या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असतं. आज सत्याचा विजय आहे. शिवसेनेने जो संघर्ष केला त्याचा हा विजय आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
बाळासाहेब व आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेल्या निर्णयांशी एकरुप झालेल्या आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिक यांचा हा विजय आहे.
हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो. आमचे सरकार नियम आणि कायद्याने स्थापन झालं. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मेरीटवर आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती.
निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणे अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानले जाते.
केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे व ठाकरे दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याचा युक्तिवाद केला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभा या बद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. पण ठाकरे गटाचे हे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत.
Post a Comment