संगमनेर : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २७ ते ३१ जानेवारी २०२३ रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे संपन्न झाली. श्री. दिगंबर गणेश सराफ विद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी संदीप गुंजाळ हिने 'विघटनशील कुंडी' हा प्रकल्प तेथे सादर केला.खांडगावची शेतकरी कन्या सिद्धीने अहमदनगर जिल्ह्याचे या परिषदेसाठी प्रतिनिधित्व केले.
तिने सादर केलेल्या पर्यावरण पूरक उपक्रमाची देशभरातील नामांकित शास्त्रज्ञांनी प्रशंसा करून तिचा सन्मान अहमदाबाद येथे केला. तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये तिचा ' विघटनशील कुंडी' प्रकल्प प्रथम क्रमांकाने सन्मानित झाला.
नर्सरी मध्ये रोपे वाढविण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात. त्यांचे विघटन न झाल्याने त्यातून प्रदूषण होते. टाकाऊ शेंगाची टरफले, माती, कागदाचा लगदा आणि झाडाचा डिंक यापासून 'विघटनशील कुंडी' तयार करता येते.
ती विघटनशील असल्याने प्रदूषण होत नाही. वाढत्या भुप्रदूषणाला यातून आळा बसेल. गाईच्या पोटात गेलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बघून कु. सिद्धीला ही कल्पना सूचली. वडील प्रगतशील शेतकरी संदीप भागवत गुंजाळ ,आई सौ.निर्मला व तिचे '१ ते ४ ' थीचे वर्गशिक्षक संदीप पावसे यांनी तिला प्रोत्साहन दिले.
हा प्रकल्प बनविण्यासाठी तिला राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक संतोष बैरागी व विज्ञान शिक्षिका एस.पी. जोशी यांनी मार्गदर्शन केले.
हुशार, मेहनती व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या कु.सिद्धीचे '१ ली ते ४ थी' पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडेश्वर मळा येथे झाले. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे श्री.दिगंबर गणेश सराफ विद्यालयाचे प्राचार्य कारभारी वाकचौरे खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ, माजी उपसभापती मधुकर गुंजाळ, संगमनेर तालुका काँग्रेस अध्यक्षा अर्चनाताई बालोडे, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक रमेशभाऊ गुंजाळ,शामप्रो चे संचालक सोमनाथभाऊ गुंजाळ, सरपंच भरत दादा गुंजाळ, उपसरपंच लक्ष्मीबाई गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते संभाजी गुंजाळ, जिल्हा परिषद प्राथमिक खांडेश्वर मळा शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा वाकचौरे, प्राथमिक शिक्षक संदीप पावसे, संजय आंबरे व अशोक शेटे यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.
Post a Comment