नाशिक : मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण यापुढे अपक्ष म्हणून काम करणार आहे, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तांबे म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीत डॉ.सुधीर तांबे यांच्या जागेवर मी उमेदवारी करावी असे काँग्रेस हायकमांडने निश्चित केले असताना आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले.
प्रदेश काँग्रेस कार्यालयातून मुद्दामहून आम्हाला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. कोरे फॉर्म दिले असा दावा प्रदेश काँग्रेसने केला असला तरी तो पूर्ण खोटा आहे. एबी फॉर्मची तांत्रिक अडचण असल्याने मी काँग्रेसचाच म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. तेव्हापासून माझ्या विरोधात स्क्रिप्टचा दुसरा पार्ट सुरु झाला.
मला बाहेर भाजपकडे ढकलण्याचे काम याव्दारे काही लोकांनी हेतुपुरस्सर केले. अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मी संजय राऊत, अजित पवारांशी चर्चाही केली. महाविकास आघाडीने मला पाठिंबा द्यावा अशी विनंती मी केली. दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वाने मला जाहीर माफी मागा अशी सूचना केली.
मी त्यासाठी तयारही झालो पक्षाचे प्रभारी एस.के.पाटील यांना पाठिंबा मागणीचे पत्रही पाठविले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनाही फोन करून चर्चा केली. परंतु, पटोले यांनी आमच्या विरोधात रान उठवले. गद्दार, फसवणुक करणारे म्हणून हिणवले हे व्देषपूर्ण होते, अशी खंत तांबे यांनी व्यक्त केली. भाजपला पाठिंबा मागितला नसताना स्थानिक पातळीवर
भाजप कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिले. राष्ट्रवादी, शिवसेना तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत मला मदत केली. भविष्यातही मी अपक्षच राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी या मतदारसंघातून अपक्ष निवडून आलो आहे, त्यामुळे यापुढेही मी अपक्षच राहणार असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. मी काँग्रेस परिवारामध्ये वाढलो आहे, पण मला पक्षांतर्गत मत मांडण्याची संधी न देता माझ्याविरोधात नेहमी वक्तव्य केली गेली, त्यामुळे माझ्याकडे पर्याय राहिला नाही असं सत्यजीत तांबे म्हणाले.
Post a Comment