शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही...

संगमनेर : आपल्या शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही. एकही दिवस खाडा न करता ते टीका करतात, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.


थोरात आज सायंकाळी संगमनेरला आले. संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना थोरात यांनी सुरुवातीला नागपूरमध्ये आपण कसे घसरून पडलो. त्यानंतर पुढे कसे उपचार झाले. या विषयी सविस्तर माहिती दिली.

मधल्या काळात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीका केली होती. त्यांचाही थोरात यांनी समाचार घेतला. थोरात म्हणाले, मुळात ते राज्याचे मंत्री असले तरी फारसे कोठे जात नाहीत. याच भागात फिरतात. कोठे गेलेच तर तेथे गेल्यावरही किमान अर्धातास माझ्यावरच बोलतात. 

संगमनेर तालुक्यात त्यांचे काय काय उद्योग सुरू आहेत, तेही आम्हाला माहिती आहे. त्यांचा हा त्रास आता फारकाळ चालणार नाही. दहशतीने मतदारसंघावर वर्चस्व मिळविले असेल तर ते इतर तालुक्यांत मिळविता येणार नाही. हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीवही बोलत असतात. 

सतत गौण खनिज आणि वाळूचा विषय काढतात. मात्र, वाळूवर बंदी घातली तर विकास काम ठप्प होतात. त्यांच्या या धोरणामुळे निळवंडे धरणाचे काम रखडले आहे. वाळू संबंधी ते इतरांवर टीका करीत असले तरी हनुमंत गावात त्यांचे काय चालले आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यांचीही ही दहशत आम्ही लवकरच मोडून काढू, असेही थोरात म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post