अहमदाबाद ः भारताने २०२३ मध्ये आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. याआधी श्रीलंकेविरुद्ध टी२० व एकदिवसीय मालिका झाली होती. या दोन्ही मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकलेल्या भारताला आता सलग चौथी मालिका जिंकली.
शुभमन गिलच्या शतकानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. भारताने या सामन्यासह तीन टी२० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.
न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर २० षटकात चार बाद २३४ धावा केल्या. भारताने दिलेलं २३५ धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची अवस्था ३ षटकात ४ बाद १३ अशी झाली होती. त्यानंतर उमरान मलिकने ब्रेसवेलला बाद करून न्यूझीलंडला २३ धावसंख्येवर पाचवा धक्का दिला. यानंतर डेरिल मिशेल वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज मैदानात तग धरू शकला नाही. डेरिल मिशेलने २५ चेंडूत ३५ धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने एकूण चार तर अर्शदीप, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताकडून शुभमन गिलने ६३ चेंडूत नाबाद १२६ धावांची खेळी केली. हार्दिक पांड्या १७ चेंडूत ३० धावा काढून बाद केला. त्याने शुभमनसोबत १०३ धावांची भागिदारी केली. दरम्यान,नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. इशान किशन दुसऱ्याच षटकात बाद झाला. मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी फटकेबाजी केली.
राहुल त्रिपाठी आणि शुभमन गिल यांनी ८१ धावांची भागिदारी केली. राहुल त्रिपाठी उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने २२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ४४ धावा केल्या. यानतंर सूर्यकुमार यादवही झेलबाद झाला.
सूर्यकुमारने १३ चेंडूत २४ धावा केल्या. यात १ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. शुभमन गिलने तुफान फटकेबाजी करत ५४ चेंडूत शतक साजरं केलं. पुढच्याच चेंडूवर षटकार खेचत संघाच्या २०० धावाही पूर्ण केल्या.
Post a Comment