पुणे ः आम्ही विचारांशी बांधील आहोत, सत्ता मिळवण्यासाठी वडिलांचे विचार सोडणारे नाही. काल निवडणूक आयोगाने दूध का दूध पानी का पानी केलं, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये मोदी @ 20 या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अमित शाह यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी निवडणूक आयोगात शिंदे यांच्या बाजूने लागलेल्या निकालावर भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
आपल्याला खूप मोठा विजय मिळाला. शिंदे साहेबांना धनुष्यबाण मिळाले आहे. 2019 ला आमच्यासोबत निवडणूक लढली, मोदींचा फोटो लावून प्रचार केला व मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्याबरोबर गेले. निवडणुकीत जय पराजय होत असतात, पण जे लोक धोका देतात त्यांना सोडता कामा नये,' असा इशारा अमित शाह यांनी दिला.
2014 ते 2022 हा कालखंड देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, असं काँग्रेस म्हणत होती. रक्ताच्या सोडा, आता दगड मारायची देखील कुणाची हिंमत होत नाही. आताही मिशन अपूर्ण आहे, 30 वर्ष पंचायत ते पार्लमेंट भाजपचं सरकार असेल, तर भारत जगात एक नंबर देश असेल.' असं म्हणत अमित शाह यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.
यूपीए सरकारच्या काळात दहशतवादी दिवसाढवळ्या देशात यायचे, आपल्या जवानांना मारून निघून जायचे. महिला सुरक्षित नव्हत्या, देशाच्या पंतप्रधानांना जगात मान नव्हता. देशाचे पंतप्रधान लिहून दिलेलं भाषण वाचायचे. सिंगापूरचे भाषण थायलंड आणि थायलंडचे भाषण सिंगापूरमध्ये वाचायचे,' असा टोला अमित शाह यांनी मनमोहन सिंह यांना लगावला.
Post a Comment