नगर ः डाॅ. जयश्री थोरात यांना आमदार झालेले पहाण्याची इच्छा काॅंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. जयश्री थोरात यांनी निवडणुकीला उभ्या राहण्याची तयारी सुरु केली तरी त्यांचा मतदारसंघ कोणता राहिली, याविषयी चर्चा सध्या काॅंग्रेस गोटात सुरु झालेली आहे.
डाॅ. जयश्री थोरात यांचा वाढदिवस नुकताच झालेला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने काॅंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्याचा संगमनेर येथे सत्कारकेला. त्यावेळी काळे यांनी भाषणातून डाॅ. जयश्री थोरात यांच्या कार्याचा उल्लेख केला.
त्याबरोबरच आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कुटुंबाला असणारा जनाधार व लोकप्रियता पाहता मागच्या दाराने नव्हे तर थेट जनतेतून डाॅ. जयश्री थोरात यांनी आमदार व्हावे, अशा शुभेच्छा किरण काळे यांनी दिल्या.
एकीकडे आमदार बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांना काॅंग्रेसच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच जर काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जर असे वक्तव्य केले तर ते जवळ येण्याऐवजी लांब जाण्याची शक्यता ज्येष्ठ नेत्यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काॅंग्रेसच्या श्रेष्ठीनीच आता सर्व लोकप्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी यांना भाषणातून बोलताना तोल संभाळण्याच्या सूचना देण्याची आवश्यकता असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत.
काळे यांनी जी इच्छा व्यक्त केली ती संगमनेर करांसाठी अभिमानाची आहे. परंतु जयश्री थोरात यांना मतदार संघ नेमका कुठला राहिल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सध्या काॅंग्रेसच्या जागेचा विचार केला तर राहाता, श्रीरामपूर व संगमनेर या तीनच मतदार संघ आहेत. या पैकी श्रीरामपूरमध्ये विद्यमान आमदार लहू कानडे यांचा संपर्क मतदारसंघात चांगला आहे. त्यामुळे ते तेथे पुढेही कायम राहणार आहेत.
राहाता मतदारसंघ हा खाली आहे. तेथून त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे लागणार आहे. मात्र या मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे थोरात यांना येथून निवडणूक लढवून जिंकणे तसे सोपे नाही. त्यांना संगमनेर हाच मतदार संघ सुरक्षीत व विजयी होण्यासाठी सोपा आहे. मात्र त्या या निवडणुकीत उभ्या राहिल्या तर आमदार बाळासाहेब थोरात यांना राजकारणापासून अलिप्त व्हावे लागेल, अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे.
जयश्री थोरात राजकारणात सक्रीय होणार असल्यामुळे तालुक्यातील महिला वर्गाला उत्साह आलेला आहे. आपले प्रश्न या अगोदर आमदार बाळासाहेब थोरात सोडत होते. परंतु आता महिलांचे नेतृत्व पुढे येत आहे. त्यामुळे आपले प्रश्न हक्काने आता त्यांना सांगता येतील, असे महिला बोलू लागल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चांगली गती येणार आहे.
Post a Comment