पारनेर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 10 मार्चला पारनेर दौऱ्यावर येणार आहेत. मात्र या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव व पुर्नर्जीवन समितीने विरोध दर्शविला आहे. कारखाना बचाव समितीकडून "शरद पवार - गो बॅक " आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्यासह राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री मागे शरद पवारांचाच हात असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे. त्यामळेच हे आंदोलन हाती घेतले आहे. याबाबत कारखाना बचाव समितीने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
पारनेर बचाव समितीने पवारांना लिहिलेल्या पत्रात पारनेर कारखाना विक्रीबाबत एकूण पंचवीस प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नाचा खुलासा दौर्यापूर्वी पवारांनी करावा असे या पत्रात म्हटले आहे. या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न दिल्यास पवारांच्या दौर्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली जाईल, असा इशारा कारखाना बचाव समितीकडून देण्यात आला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारनेर साखर कारखाना भ्रष्ट मार्गाने विक्री करून शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे माजी खासदार विदुरा नवले यांनी तो बळकावल्याचा कारखाना बचाव समितीचा आरोप आहे.
पारनेर विकत घेणारी क्रांती शुगर कंपनीने गेल्या सात आठ वर्षांपासून उसाला सर्वात कमी भाव देवून पारनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे समितीचे म्हणणे आहे. तसेच पारनेर कारखान्याच्या उर्वरीत मालमत्ता हडपण्यावर त्यांचा डोळा आहे.
पारनेर कारखाना विक्रीतून उरलेली रक्कम, दीडशे एकर संपादित जमीनीचा मोबदला पारनेरला मिळू दिला जात नाही. पोलिसांकडून न्यायालयात खोटा चौकशी अहवाल सादर करणे, शासनाकडील दाखल असलेला पुर्नर्जीवन प्रस्ताव मंजूर करण्यास हस्तक्षेप करणे, प्रशासनाकडून अवसायक न हटवणे यामागेही पवारांचा हात असल्याचे बचाव समितीचे म्हणणे आहे.
त्यामुळे कारखाना बचाव समितीने त्यांना कारखाना कार्यक्षेत्रात येण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे असे या निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्यासह राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे.
Post a Comment