चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील जागृत देवस्थान चाँदखावली बाबांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. आज शुक्रवार यात्रेचा मुख्य दिवस होता. मात्र दुपारीच अवकाळीने पुन्हा एकदा दणका दिल्याने भाविकांसह व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
चाँदखावली बांबाची यात्रा दरवर्षी अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारपासून सुरु होते. त्यानुसार काल गुरुवार रोजी गंगेच्या पवित्र जलाने बाबांचा जलाभिषेक केल्यानंतर यात्रा सुरु झाली. आज यात्रेचा मुख्य दिवस होता.
आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गढीवर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र अचानक आलेल्या पावसाने काही काळ धावपळ झाली. त्यातच अवकाळीच्या धसक्याने सर्व जण शेताच्या कामात व्यस्त झाल्याने चार वाजेपर्यंत कमी गर्दी होती. मात्र पाचच्यानंतर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
चॉंदखावली बाबा नवसाला पावणारे बाबा म्हणून चांदा आणि परिसरात ज्ञात आहेत. आज मुख्य दिवशी नवसपूर्ती केली जाते. गावातील सर्व धर्मिय भाविक श्रीफळ, मलिदा, शेरणी , चादर अर्पण करून मनोभावे दर्शनासाठी गर्दी झाली होती.
सायंकाळी गावच्या वतीने मानाची चादर वाजतगाजत बाबांना अर्पण करण्यात आली. त्यानंतर विविध मंडळ व संघटनांची चादर मिरवणूक झाली. रात्री छबिना मिरवणूक झाली. उद्या शनिवार रोजी मोठी यात्रा बाजारतळावर भरणार आहे.
या ठिकाणी आजपासून खेळणी तसेच सौदर्यप्रसाधनाची दुकाने लावण्यास सुरुवात झाली आहे. येथे खरेदीसाठी चांदा आणि आसपासच्या गावातील महिला आणि चिमुकल्यांची मोठी गर्दी होते. यंदा सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
चाँदखावली बाबा नवनाथ सांप्रदायातील नाथ असल्याचे जुणे जाणकार सांगतात. त्यामुळे या ठिकाणी सर्व धर्मिय भाविक मोठ्या श्रद्धेने एकत्र येऊन यात्रा साजरी करतात.
चॉंदखावली बाबा हे गावचे दैवत आहे . या ठिकाणी असलेली मोठी गढी हे गावचे वैभव आहे. अठराव्या शतकात या गढीचे काम झाल्याच्या उल्लेख शिलालेखावर आढळतो. पूर्ण मातीत सर्वात उंच असलेल्या या गढी आणि देवस्थानचा जिर्णोध्दार होणे गरजेचे आहे.
देवस्थानच्या बाजूने वेडया बाभळीच साम्राज्य वाढले आहे. गढीची माती काढली जात आहे. जिर्णोध्दार करण्यासाठी सामुहिक इच्छाशक्तीची गरज आहे. हे ऐतिहासिक देवस्थानचे संगोपन होणे गरजेचे असल्याने जिर्णोध्दारासाठी नकारत्मकता बाजुला सारून सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाविकांनी व चांदा ग्रामस्थांनी केली आहे.


Post a Comment