नेवासा : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने सर्व 18 जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी माजी आमदार मुरकुटे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना मोठी ताकत देऊनही भाजपच्या उमेदवाराचे पानिपत झाले आहे, हे विशेष.
माजी मंत्री तसेच आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील मंडळाची गेली अनेक वर्षे नेवासा बाजार समितीमध्ये निर्विवाद सत्ता आहे. राज्य सरकारने बाजार समिती कायद्यात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणूकीत विरोधकांनी भाजपच्या माध्यमातून माजी आमदार मुरकुटे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लंघे यांच्या नेतृत्वाखाली मोट बांधली.
आमदार गडाख यांच्यावर नाराजी आहे, त्यांनी कामे केली नाहीत असा विरोधकांनी प्रचार करुन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमदार गडाख यांनी त्याकडे दुर्लक्ष करत मोठे मेळावे न घेता स्वतः व्यक्तिगतरित्या थेट मतदारांशी संपर्क साधला.
बाजार समितीची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम समजली गेल्याने त्यात मुरकुटे व लंघे यांना मतदारांनी साफ नाकारले असून आमदार गडाख यांच्यावरच विश्वास ठेवल्याचे दिसून आले.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार गडाख गटाचे काळे अमृत चंद्रचूड, ढोकणे मिराबाई पांडुरंग, नवले अर्जुन ऊर्फ बाळासाहेब बाजीराव, पटारे हरीचंद्र नाथा, पाटील नंदकुमार लक्ष्मण, शिंदे अरुण पांडुरंग, सावंत अरुण दादासाहेब, काळे अश्विनी भारत, सानप संगिता राजेंद्र, आखाडे बाबासाहेब रंगनाथ, ढवाण सुंदराबाई सारंगधर, दहातोंडे बाळासाहेब मच्छिंद्र, नवथर नानासाहेब साहेबराव, धायजे सुनिल दिगंबर, भोरे गणेश पुरोषोत्तम, देशमुख दौलतराव चंद्रकुमार, मिसाळ संतोष तुकाराम हे उमेदवार विजयी झाले. हमाल मापाडी मतदार संघात मोटे रमेश भाऊराव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
माजी आमदार मुरकुटे उमेदवारी देऊन सोडून देतात, कार्यकर्त्यांना बळ देत नाहीत, फक्त स्वतः च्या राजकीय स्वार्थासाठी आमचा वापर करतात असा जाहीर आरोप भाजपच्या बाजार समितीतील उमेदवाराने करून नुकताच गडाख गटात प्रवेश केला होता. निवडणुकीच्या अगोदर भाजपच्या अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांनी उमेदवारी नाकारली होती, हे या निवडणूकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.
आमदार गडाख यांच्यावर नाराजी असून मतदार त्यांच्या विरोधात आहे, निवडणुकीत त्यांना धोका होईल अशी मोठी चर्चा होती परंतु गडाख यांनी गाव पुढाऱ्यांना टाळत थेट मतदारांशी 'वन टू वन ' चर्चा केल्यानेच त्यांना हे यश मिळाल्याचे दिसून येते. त्यांचे विरोधक मेळावे व आरोप करण्यात दंग राहिले. तालुक्याच्या राजकीय तसेच सहकार क्षेत्रावर आमदार गडाख यांचेच वर्चस्व कायम टिकून असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Post a Comment