नगरपंचायत नेवासा येथील कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या रोजगाराची व भविष्य निर्वाहनाची हामी मिळवून देण्यासाठी 7 मे 2023 रोजी भारतीय मजदूर संघाची जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत स्तरावरील शाखा स्थापन करण्यासाठी अखिल भारतीय मजदूर संघाचे प्रदेश संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर तसेच प्रदेश सचिव राधेश्याम कुलकर्णी हे स्वतः जातीने हजर होते.
पालिका कार्यवाह संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान व समान वेतन हे कायद्यानुसार मिळालेच पाहिजे. त्यासाठी आग्रही भूमिका मजदूर संघाची असेल. तसेच भविष्य निर्वाह निधी हा कामगाराच्या पगारातून कपात केलेला असेल परंतु त्याच्या योग्य खात्यात योग्य वेळेत भरला गेला नसेल तर संबंधित नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यावर व संबंधित ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. कामगारांच्या हितासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
प्रदेश संघटन मंत्री श्रीपाद कुटास्कर यांनी भारतीय मजदूर संघ ही जगातील सर्वात मोठी कामगारांची संघटना असल्याचे नमूद करत कुठलेही राजकीय प्रभावाने प्रभावित न होणारी संघटना असल्याचे सांगितले. केंद्राचे व राज्याचे कामगार हिताचे सर्व धोरण हे राबवून घेण्याची संघटनेची कार्यपद्धती त्यांनी नमूद केली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष संजय दुधाने यांनी सांगितले की कामगारांच्या न्याय व हक्काच्या लढ्यात आम्ही बरोबरीने अग्रेसर राहू. कुठल्याही कामगारांना विना सूचना अरेरावी पद्धतीने कामावरून काढता येणार नाही. तसेच कामगारांचा भविष्य निर्वाह निधी हा कामगारांना द्यावाच लागेल. कामगारांचा पगार हा महिन्याच्या पाच तारखेच्या आत त्याच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यात विना कपात व किमान वेतनानुसार जमा व्हायला हवा. अन्यथा सदर नगरपंचायतच्या विरोधात कामगारांच्या न्यायालयात खटला चालवून प्रत्येक कामगाराला न्याय देण्याची भूमिका भूमिका घेण्यात येईल. कामगारांना आरोग्य विमा, बोनस व हक्काच्या रजा यांसाठी अखिल भारतीय मजदूर संघ प्रयत्न करेल. नगरपालिकेच्या रहिवाशांच्या आणि कामगारांच्या मध्ये सौहार्दपूर्ण वातावरण ठेवून कामगारांच्या हिताचे धोरण आखले जाईल. लवकरच जिल्ह्यातील प्रत्येक नगरपंचायत कार्यक्षेत्रात एक एक शाखा उघडून स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्यासाठी एका जिल्हास्तरीय, व्यापक लढ्याची आखणी केली जाणार आहे.
यावेळी नगरसेवक इंजिनियर सुनील वाघ व डॉ करणसिंह घुले यांनी मनोगत व्यक्त करून कामगारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कामगार कृष्णा डहाळे यांनी केले. तर कृष्णा साठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment