राहाता : शिर्डी विमानतळावर शनिवारी ८ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून १० मिनिटांनी दिल्लीहून निघालेले इंडिगोचे एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान २११ प्रवासी काकडी विमानतळ येथे घेऊन आले.
मागील अनेक दिवसांपासून सुरू होणाऱ्या नाईट लॅडिंग सुविधेची शनिवारी रात्री खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली. शनिवारी रात्री नऊ वाजता २३१ प्रवाशांना घेऊन हेच विमान दिल्लीकडे प्रयाण झाले.
या विमानसेवा नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने शिर्डी विमानतळाच्या विकासाला व परिसराच्या अर्थकारणाला मोठी गती येणार आहे. साईबाबा दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांमध्ये आनंद व उत्साह दिसून आला.
शिर्डी विमानतळाचे संचालक सुशील श्रीवास्तव यांनी केक कापून या प्रवाश्यांचे स्वागत केले. विमानतळ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
रात्रीच्या या विमानसेवेचा प्रवाश्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. या विमानसेवेमुळे देशपातळीवरील प्रवाशांना एकाच दिवसात दर्शन घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे भाविकांचा वेळ व श्रम ही वाचणार आहे. पर्यायाने स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Post a Comment