अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यातील राजकारण नेहमीच वादग्रस्त असते. पण सध्या भाजपमध्येच अंतर्गत विरोध वाढायला लागल्याचे दिसून येत आहे. मागील दोन सहकारी संस्थांच्या निवडणुकीत खासदार सुजय विखे पाटील यांच्या यंत्रणेने आमदार बबनराव पाचपुते यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे आमदार पाचपुते यांच्या गटात खा. विखे यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे .
श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुक मागील दोन महिन्यापूर्वी झाली. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी श्रीगोंदा बाजार समितीची निवडणूक झाली. या निवडणुकीत खासदार सुजय विखे पाटील यांच्या यंत्रणेने आमदार बबनराव पाचपुते गटाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले.
या निवडणुकीचा निकाल लागल्यावर सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती असे स्वतः खासदार माध्यमांना बोलले असताना त्यानंतर च्या पदाधिकारी निवडीच्या अगोदर खासदारांनी यूटर्न घेतल्याचेही पहिले आहे . कालच्या निवडीत उपसभापतींची निवड ही विखे गट म्हणूनच झाल्याची चर्चा आहे.
मध्यंतरी काष्टी येथे खासदार व आमदारांनी विकासकामांसाठी सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांशी एकत्रित चर्चा केली होती. त्यावेळी विखेंना माननारा गट हा पाचपुते यांना देखील माननार आहे इतर कार्यकर्त्यांना कोणतीही किंमत देणार नाहीत असे विखेंनी सांगितले होते.
पण गत काही महिन्यांपासून तालुक्यात वेगळे चित्र दिसून येत आहे. विखेंची यंत्रणाच पाचपुते विरोधी वागत असल्यामुळे भाजपमध्ये आता अंतर्गत कुरघोडी चालल्याचे दिसून येते.
येथील विखेंची यंत्रणा नेमके काय करते हे खासदारांना माहिती आहे का ?का खासदारांची मूक संमती आहे हेच कार्यकर्त्यांना समजेना.
अनेक गावामध्ये आमदार पाचपुते गटाच्या विरोधी कार्यकर्त्यांना हि यंत्रणा बळ देत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे खासदार सुजय विखे यांच्या बाबत पाचपुते गटात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. विखेंचा संपर्क ठेवणाराच व्यक्ती तालुक्यात विरोधी गटाला ताकद देत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.

Post a Comment