जामखेड : विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात, हे आज मला पाहायला मिळाले अनुभवायला मिळाले, अशी टीका आमदार राम शिंदे यांनी केली आहे.
बाजार समिती सभापती निवडीवरुन आमदार राम शिंदे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. विखे पक्षाच्या विरोधात काम करतात. हा अनुभव आला आहे, असे सांगून शिंदे यांनी भाजपमध्ये असे प्रकार चालणार नाही असं म्हटले आहे.
राम शिंदे यांनी विखे यांच्या विरोधात जाहीर वक्तव्य केल्यामुळे भाजपात संघर्ष सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. जामखेडबाजार समितीच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत सुरू झालेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
पक्षश्रेष्ठी हा वाद मिटवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विखे खरोखरच पक्षविरोधी कारवाई करतात का? याची पक्षाने आता सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
या अगोदरही विखे यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप झाले होते. याबाबत तक्रारीही करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे जिल्ह्यातील आजी माजी आमदारांनी तक्रारी केल्या होत्या या तक्रारीचे पुढे काय झाले. हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता राम शिंदे यांनी पुन्हा तक्रारी केल्या तरी त्यावर काहीच कारवाई होणार नाही अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

Post a Comment