नगर : बालिकाश्रम रस्त्यावर मंगळवारी (ता. 20) पहाटे ओंकार भागानगरे याचा खून झाला होता. या प्रकरणातील दोन प्रमुख आरोपींना शुक्रवारी (ता. 23) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली होती.
गणेश हुच्चे व नंदू बोराटे असे जेरबंद आरोपींची नावे आहेत. तर तिसरा मुख्य आरोपी संदीप गुडा हा पसार होता. त्याला काल (रविवारी) रात्री उशिरा तोफखाना पोलिसांनी पुण्यातून जेरबंद केल्याची चर्चा सुरु आहे.
या प्रकरणात आतापर्यंत तीन मुख्य आरोपी व त्यांना सहाय्य करणारे चार आरोपी अशा सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. माळीवाडा परिसरातील अवैध धंद्यांची माहिती दिल्याचा राग मनात धरून ओंकार भागानगरे व त्याच्या मित्रांवर बालिकाश्रम रस्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
यात ओंकार भागानगरे याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गणेश हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
त्यावरून पोलिसांनी खून, जीवघेणा हल्ला व अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असात त्यांना न्यायालयाने मंगळवार (ता. 28) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Post a Comment