नगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील काही नेते सध्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या वाटेवर आहेत. आगामी निवडणुकीत बीआरएस पक्ष सर्वच पक्षांपुढेमोठा पेच निर्माण करेल अशी चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे नाराजी असल्याचे दिसून येत आहे. या नाराजीतून काहीजण पक्षांतर करण्याच्या हालचाली करीत आहेत. काहीजण राष्ट्रवादीतून भाजप व शिवसेनेसह इतर पक्षात जात आहे. मात्र काहीजण त्याच त्या पक्षात जाण्यास कंटाळले असून आता नवीन पक्षांच्या शोधात आहेत.
अजित पवार यांचे विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी हैदराबाद येथील मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे.
या प्रवेश सोहळ्या प्रसंगी श्रीगोंद्यातील प्रशांत शेलार, शामभाऊ जरे, शरद पवार, अजिम जकाते प्रविण शेलार, प्रकाश निंभोरे, संजय आनंदकर, केशव झेंडे, विलास भैलुमे, आबासाहेब शिंदे, संदीप दहातोंडे, रिंकु इथापे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे शेलार यांनी हा पर्याय निवडला आहे. त्यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातील काही नेतेही बीआरएस पक्षात प्रवेश करण्यास इच्छूक आहेत.
भाजपमधीलही काही नाराज मंडळी बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. ही सर्व नाराज मंडळी आता बीआरएसमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सर्वच पक्षांची बीआरएस डोकेदुखी वाढविणार आहे.
नाराजमंडळींनी पक्ष सोडू नये यासाठी आता सर्व पक्षाला मोर्चे बांधणी करावी लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बैठका घ्याव्या लागणार असल्याचीचर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे.
Post a Comment