अमर छत्तीसे
श्रीगोंदा : सध्या जिल्हाभर जल जीवन योजनेचा बोलबाला चालू असताना आढळगावमध्ये या योजनेवरुन सरपंच व उपसरपंच आमने सामने आले आहेत.
आज सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी पंचायत समितीच्या समोर ग्रामस्थांसह उपोषण केले तर उपसरपंच अनुराधा ठवाळ व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले आहे.
आढळगावमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची जल जीवन योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर असून या कामात गैरप्रकार चालू असुन संबंधित ठेकेदार स्वतः काम करत नसून सरपंचांच्या जवळचे लोक काम करत आहेत.
या कामावर अधिकारी लक्ष देत नाहीत, आदी मागण्यासाठी अनिल ठवाळ यांनी जिल्हा परिषद समोर उपोषण केले. या उपोषणाला उपसरपंच अनुराधा ठवाळ उपस्थित होत्या.
अनिल ठवाळ हे बोगस तक्रारी करून विकास कामात अडथळा आणत आहेत. अधिकारी वर्गाच्या खोट्या तक्रारी करून संपत्ती गोळा करत आहेत. याची चौकशी करून ठवाळांच्या खोट्या तक्रारी ची दखल शासनाने घेऊ नये या मागणीसाठी सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी ग्रामस्थांसह पंचायत समिती समोर उपोषण केले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे व्हा चेअरमन शरद जमदाडे. ग्रा. पं सदस्य मनोहर शिंदे नितीन गव्हाणे. चेअरमन दादा गव्हाणे. गणेश शिंदे. विजय वाकडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मागील दोन वर्षांपूर्वी आढळगाव मध्ये ग्रामपंचायत च्या निवडणुका झाल्या यामध्ये उबाळे यांना सरपंच करण्यासाठी ठवाळ यांनी हातात हात दिला. त्यावेळी अनेकांनी राजकीय विरोध संपल्याचे सांगीतले.
मात्र आज दोन्ही गट एकमेकांच्या समोर ठाकले त्यामुळे त्यावेळी केलेले भाष्य हे अर्धवटच होते हे आजच्या घडामोडी वरुन दिसून आले.सत्तेत एकत्र आलेल्यांचे नेमके बिनसले कुठे अशी चर्चा गावात सुरू आहे.
Post a Comment