अमर छत्तीसे
श्रीगोंदा : सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये प्रशासकराज आहे. गत सदस्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले ठेकेदार टक्केवारीमुळे मुजोर झाल्याचे दिसून येत आहे. हे ठेकेदार अजूनही माजी सदस्यांचा धाक दाखवून अधिकारी वर्गाला वेठीस धरत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
श्रीगोंदा तालुका नेहमीच वादग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील सर्वच पक्षातील नेते मंडळी हे सक्षम आहेत. पण काही नेतेमंडळींना हाताशी धरून कोट्यावधीची कामे हे बोलघेवडे ठेकेदार पदरात पाडून घेत आहेत.
सध्या जिल्हा परिषदेत प्रशासक राज आहे. या काळातही ठेकेदारांची शिरजोरी दिसून येत आहे. एखाद्या शासकीय कार्यालयातील दुरुस्ती अथवा नवीन कामाचे बील रखडले तर संबंधित कार्यालय प्रमुखाला थेट नेत्याचा फोन लावून आपली बिले काढून घेण्याचे काम करत आहेत अशी चर्चा सध्या सुरू आहे.
आता ते पदाधिकारी माजी झाल्यामुळे ठेकेदार मग्रूर बनले आहेत. त्यांची सध्याची भूमिका "जिकडे घुगर्या तिकडे उदोउदो" अशी झाली आहे..
सध्या श्रीगोंदा पंचायत समितीचा कारभार "राम"भरोसे चालला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील गटविकास अधिकारी हे पद प्रभारींकडे आहे. या प्रभारी राजचा फायदा अनेकांनी उठवण्यास सुरुवात केली आहे. पंचायत समिती काही विभागातील अधिकारी व कर्मचारी दुपारी गायब असतात.
अनेक विकास कामे चालू आहेत पण ही कामे मंजूर करताना मलिदा द्यावा लागतो तरच कामे भेटतात उलट कोणी विचारणा केली तर ऑनलाईन टेंडर हे गोंडस नाव दिले आहे. सर्वत्र टक्केवारी चालू असल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत कोणीच बोलत नाही ना अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतात. सर्व अलबेल असल्याचा आव आणला जातो.

Post a Comment