मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी एका युजरने दिली आहे. यामध्ये तुमचा दाभोळकर करू असं म्हटलं आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी या प्रकरणासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
"मला व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. कुठल्या तरी अकाऊंटवरुन अशी एक धमकी दिली जात आहे. त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याही अशा काही कमेंट्स आल्या आहेत.
या कमेंट्स आक्षेपार्ह आहेत. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने नोंद घ्यावी. हा विषय मी आज मुंबईच्या पोलिस आयुक्तांपर्यंत कळवला आहे. पवारांबद्दल आलेली धमकी दुर्दैवी आहे.
राजकारणामध्ये मतभेद नक्की असतात. पण इतका द्वेष पसरवला जातोय, हे फार दुर्देवी आहे," असं सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. यावेळेस त्यांनी या वादग्रस्त ट्वीट्स आणि कमेंट्सचे प्रिंटही प्रसारमाध्यमांना दाखवले.
शरद पवारांची सुरक्षा हा गृहमंत्रालयाचा विषय आहे. ते देशाचे नेते आहेत. त्याबद्दल गृहमंत्रालयाने लक्ष घालावं. याबद्दल मी काय सांगणार?" असा प्रतिप्रश्न विचारला. शरद पवारांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे का असं विचारलं असता, "मी जी धमकी आली त्याबद्दल तक्रार केली त्यावर त्यांनी लवकरच कारवाई करु असं आश्वासन दिले आहे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Post a Comment