नगर ः घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीला (वय 16) मध्यरात्री पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, तोफखाना पोलिसांनी मुलीसह तिला पळवून नेणार्याला ताब्यात घेतले आहे. मुलीचा जबाब नोंदविण्यात आला असून पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढीव अत्याचार, पोक्सोचे कलम लावण्यात आले आहेत.
गुरूवारी (ता. 14) रात्री 11 ते शुक्रवारी (ता. 15) पहाटे अडीचच्या दरम्यान नगर शहरातील एका उपनगरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते. ती घरात झोपलेली असताना मुलीला पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आजोबाने तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी दिली होती. पोलिसांनी भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, मुलीसह तिला पळवून नेणार्याचा तोफखाना पोलिसांकडून शोध सुरू होता. ते दोघे मिळून आले आहेत.
आशिष कुंडलिक निकाळजे (रा. बोल्हेगाव) असे पळवून नेणार्याचे नाव आहे. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून घेतला असून तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. निकाळजे याने पीडित मुलीला तिच्या घरातून पळवून नेले. ते येथून मनमाड व पुढे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गेले होते.
गेल्या मंगळवारी तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेले होते. त्यातील एकीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर आता पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही बाब गंभीर असून पालकांची चिंता वाढविणारी आहे.
Post a Comment