नगर : आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या राहुरीतील राजकीय कार्यकर्त्यांना पोलिसांनी तडीपारच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना तडीपार का केले जात नाही असा प्रश्न माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केला आहे.
न्यायालयाने आदेश देऊनही शिवाजी कर्डिले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निलंबित करा, ॲड. अभिषेक भगत यांना पोलिस संरक्षण द्यावे, तक्रारीची शहानिशा न करता ॲड. भगत यांच्यावर 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यातून त्यांना वगळावे या मागणीसाठी आमदार तनपुरे यांनी उपोषणाचाही इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना ८ दिवसांची मुदत दिली आहे.
यासंदर्भातील निवेदन आमदार तनपुरे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, जि. प. माजी सदस्य बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, संजय झिंजे आदींनी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांना दिले. त्यानंतर आमदार तनपुरे पत्रकारांशी बोलत होते.
आपण शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागितल्याने आपल्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जातील, त्यामुळे पोलिस संरक्षण मिळावे असे निवेदन आपण यापूर्वीच पोलिसांना दिले होते. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार हे कर्डिले यांच्या वर्चस्वाखालील बाजार समितीमध्ये नोकरीला आहेत तसेच संचालक आहेत. फिर्यादीचे अवैध व्यवसाय आहे. या सर्वांनी पूर्वनियोजित कट करून हा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा ॲड. भगत यांनी केला.
Post a Comment