नगर ःजिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभाराचा सर्वसामान्यांना नव्हे तर आता कर्मचाऱ्यांनाही फटका बसलायला लागलेला आहे. या ढिसाळ कारभारामुळे अनेकांना बॅंकांसह इतर हप्त्यांचे भुर्दंड पडलेले असून कर्मचार्यांमधून सामान्य प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. या पुढे असा प्रकार होऊ नये, असे नियोजन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने करावे, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पगार महिन्याच्या पहिल्याच तारखेला होत आहे. तर इतर कर्मचाऱ्यांचे पगार हे चार ते सहा तारखेच्या दरम्यान होत आहे. मात्र डिसेंबर महिन्यात मात्र सामान्य प्रशासन विभागातील सावळागोंधळ कारभारामुळे हे पगार तब्बल सहा दिवस लेट झालेले आहेत. पगार लेट कसे व कोणामुळे झाले याचा अभ्यास सामान्य प्रशासनने करणे गरजेचे आहे.
या सहा दिवस पगार लेट झाल्यामुळे मुख्यालयासह जिल्ह्यातील इतर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा मनस्ताप सहन करण्याची वेळ आलेली आहे. काहींचे बॅंकांचे हप्ते वेळेत न गेल्याने त्यांना आर्थिक दंड सहन करावा लागला आहे. तर काहींना घरातील आजारी मंडळींना वेळेवर दवाखान्यात पैसे नसल्याने नेता आलेले नाही. मात्र कर्मचाऱ्यांचे हाल होऊनही प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतलेली आहे. प्रत्यक्षात कोणावरच कारवाई केली नसल्याने कर्मचाऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
म्हतारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावला नाही पाहिजे, या म्हणी प्रमाणे पगार लेट झाले त्याचे दुःख नाही. झालेला भुर्दंड आम्ही एक वेळ सहन करू. परंतु असा प्रकार वारंवार व्हायला नको, म्हणून आता सामान्य प्रशासन विभागाने या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यातूनच यातील सत्य बाहेर येणार आहे. या पगार लेट बाबत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वेगवेगळी चर्चा सुरु आहे. ही चर्चा सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कानावर असून त्यावर सर्वांनीच मौन पाळलेले आहे. (क्रमशः)
Post a Comment