जामखेड : दीड वर्षांपूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) येथे मुकादमावर गोळीबाराचा प्रकार घडला. पायाला गोळी लागल्याने मुकादम जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (ता.३) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.
आबेद बाबुलाल पठाण (रा. गरडाचे पाटोदा, ता. जामखेड) यांनी गोळीबाराबाबत जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय ऊर्फ चिंचंग्या विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा गरडाचे) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आबेद पठाण हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. त्याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे (रा. जामखेड) हा ऊसतोड मजूर कामाला होता. मजूर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दीड वर्षांपूर्वी यातील आरोपी अक्षय ऊर्फ (चिंग्या) विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा गरडाचे) याने मारहाण केली होती. या मारहाणीमुळे दीड वर्षापूर्वी जामखेड पोलिस ठाण्यात अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदविली होती.
याचाच राग मनात धरून रविवारी (ता. ३) रात्री एक वाजता अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने पाटोदा गरडाचे येथे त्याच्या साथीदाराच्या मदतीने आबेद पठाण यांच्यावर तीन राउंड फायर केले. यामध्ये एक गोळी पठाण यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले. त्यांना तातडीने अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Post a Comment