मुंबई : पाच वर्षांचा वनवास भोगला, आता स्वाभिमानाची लढाई लढायची असल्याचे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. हे संकेत तंतोतंत खरे ठरले आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून कोणतीही निवडणूक जवळ आली की पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येतं. पंकजा मुंडे यांचे नाव विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी चर्चेत आले. त्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्यावेळी देखील पंकजा यांचे नाव सातत्याने चर्चेत येत होते.
पंकजा मुंडे या भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे. बीडमधील मोठा जनसमुदाय पंकजा यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे.
पण तरीदेखील भाजपकडून अद्याप पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कदाचित पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारीचं तिकीट दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा होती. ती खरी झाली आहे.
भाजपने आज लोकसभा निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यादीत पंकजा मुंडे यांना यांना उमेदवारी दिली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खासदार प्रीतम मुंडे यांना थांबवून त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Post a Comment