अतुल लहारे
नगर ः लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरु आहे. या निवडणुकीतील वाहत्या गंगेत आता काहींनी हात धुवून घेण्यास सुरवात केलेली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अडचणीत आणून आगामी निवडणुकांचे शब्द घेतले जात आहे. आता तूर्त तरी सर्वच विधानसभा मतदारसंघात नेत्यांसह कार्यकर्त्यांना योग्य संधीचे शब्द दिले जात आहे. मात्र प्रत्यक्षात किती जणांना संधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच निवडणुकीत काहींनी विधानसभेची रंगीत तालीम सुरु केलेली आहे.
सध्या जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उभे राहणाऱ्यांची भाऊगर्दी झालेली असून त्यातील अनेकांना ज्येष्ठ नेत्याकडून शब्द दिला जात आहे. त्यामुळे आता सध्या सगळेच खूश दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक होऊ द्या, सर्वांनाच संधी देऊ, असे स्पष्ट मत ज्येष्ठांकडून मांडले जात आहे. सध्या हाच मुद्दा धरून मनधरणी सुरु आहे. या मनधरीत एकाला जवळ केले की दुसरा बाजुला जात आहे.त्यामुऴे लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत आतापासून दिसून येत आहे.
या अगोदरच्या निवडणुकीत काहींना शब्द दिले होते. मात्र ते शब्द पाळण्यात आलेले नाही. त्यामुळे आता नव्याने शब्द प्रत्येक तालुका व विधानसभा मतदारसंघात दिला जात आहे. त्यामुळे नेत्यांच्या शब्दाला किती मान द्यायचा असा प्रश्न आता सर्वांसमोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे नेते मंडळीही आता आता शब्द देताना विचार करीत नसली तरी शब्द ज्याला दिला तो मात्र नेते तो पूर्ण करील का याबाबत खबरदारी घेत आहेत. काहींनी तर नेत्यांना मागील निवडणुकीत आपण काय केले असा थेट सवाल केला जात आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा खरी ठरत आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून ते थेट विधानसभा व काहींनी थेट मंत्री करण्याचे शब्द जाहीर सभांमध्ये दिलेले आहे. मात्र पहिले आपण निवडून यावे, त्यानंतर सरकार स्थापन होणे महत्वाचे आहे. त्यानंतर मंत्रीपद मिळते, मात्र या सर्व बाबींचा विचार सोडून प्रत्येकजण न होणारे स्वप्न पहात असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. याकडे पक्षाच्या नेत्यांनी वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी जोरधरत आहे.
Post a Comment