नगर : लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना उमेदवाराचा प्रचार करण्याच्या कारणावरुन एकाला मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत अरुण परसराम डांगे (वय ४५, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरुन युवासेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड (रा. अहमदनगर) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला.
डांगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझा मित्र मतदान सुरू असताना स्टेट बँक चौकातील छावणी, कॉम्प्लेक्सच्या गाळ्यासमोर थांबलो होतो. त्याठिकाणी विक्रम राठोड आले व उमेदवाराचा प्रचार करण्यावरुन वाद घालण्यास सुरूवात केली.
फिर्यादी राठोड याला म्हणाले की, आम्ही प्रचार करत नाही. त्यानंतर राठोड यांनी फिर्यादी यांना थांबवून शिवीगाळ करत चापटीने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या खिशात शाईची बाटली टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात राठोडसह दोघांवर गुन्हा दाखल झाला.
या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्हीची मदत घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Post a Comment