नेवासा ः आगामी विधानसभा निवडणुकीत नेवासा विधानसभा मतदारसंघातील जागा भाजपकडे यावी, अशी मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी या मतदारसंघातून सक्षम उमेदवार उभा करणे गरजेचे आहे. त्यामुळे माजी खासदार सुजय विखे यांनाच या मतदारसंघातून संधी द्यावी, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. यामध्ये सध्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सचिन देसर्डा, ऋषीकेश शेटे, माजी आमदार शिवाजी कर्डिले आदींची नावे चर्चेत आहेत. परंतु या नावांना तालुक्यातील निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमधून विरोध केला जात आहे.
ही मंडळी स्वहित पाहणारी असून कार्यकर्त्यांचे बळ वाढविण्याऐवजी ते आपले समर्थकांचे बळ वाढविण्यात व्यस्त राहतात, त्यामुळे यांना पैकी कोणालाच पक्षाने संधी देऊ नये, असे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. या पैकी कोणीही उमेदवार उभा राहिला तर ही जागा जाण्याची भीती कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
माजी खासदार सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे. त्यांचे पुर्नवसन होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना नेवासे विधानसभा मतदारसंघातून संधी द्यावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. विखे यांच्या नावाला तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमधून विरोध राहणार नसून सर्वजण एकदिलाने काम करून त्यांना विजयी करतील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.
विखे यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी नेवासा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ भाजप नेत्यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. विखे यांना उमेदवारी दिली तर आम्ही सर्वचजण त्यांचा प्रचार करणार असल्याचे आश्वासन कार्यकर्ते देत आहेत.
विखे यांचीही कार्यकर्त्यांची फौज तालुक्यात आहे. तसेच शालिनी विखे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तालुक्याला भरीव निधी देऊन विकास कामे केलेली आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही अनेकदा तालुक्यासाठी विशेष उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघातून विखे यांनाच संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विखे व गडाख लढत व्हावी, अशी अपेक्षा अनेकांची होती. मागील लोकसभा निवडणुकीपासून संपूर्ण जिल्हा ही लढत व्हावी, म्हणून वाट पहात आहे. लोकसभेला ही लढत होऊ शकली नाही. त्यामुळे नेवासा विधानसभा मतदारसंघात ही लढत व्हावी, अशी अपेक्षा आता भाजपसह सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. राज्यात ही लढत चुरशीची होणार आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Post a Comment