नगर ः दूधाला ४० रुपये व शेतीमालाला हमीभावासाठी पुकारण्यात आलेल्या जनआक्रोश आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढून जिल्हाधिकारी, दुग्धविकास मंत्री यांच्यासह सरकारचा निषेध नोंदावला.
कांद्याचे कोसळलेले भाव तसेच दूधदरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. पाच) रोजी शेतकरी जनआक्रोश आंदोलन पुकारले आहे. शासनाने दुधाला ४०रुपये हमीभाव द्यावा, अशी आग्रही मागणी होत आहे. मात्र प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे व दुग्धविकास मंत्री यांच्या दुर्लक्षामुळे हे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु होते.
शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच जनावरे बांधली होती. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन आंदोलकांनी केले. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागून गुलमोहर रस्त्याने सूरभी हाॅस्पिटल, डीएसपी चौक, स्टेट बॅंक चौक, चांदनी चौक, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार हार घालून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार घालून टिळक रोड ने नेप्ती नाका, दिल्ली गेट, आप्पू हत्त्ती चौक लालटाकी, पत्रकार चौक, एसपी चौकातून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रॅलीचा समारोप झाला.
या रॅलीत ट्रॅक्टरसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यातील शेतकरी तथा राजकीय नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनाच्या तिसर्या दिवशी शेतकरी व आंदोलनकर्ते यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून रॅलीत सहभागी झाले. आत्ताचे पालकमंत्री यांना शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नाही, त्यांना व त्यांच्या सरकारला फक्त खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम करत आहेत. हे सरकार झोपले नाही ते शेतकऱ्यांबाबत झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नाही, असा आरोप आंदोलकांतर्फे करण्यात आला.
यावेळी मोठ्या प्रमाणात शासन विरोधी घोषणा देण्यात आल्या. या दरम्य़ान शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.
Post a Comment