नगर ः श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. सर्वांनाच आमदारकीचे स्वप्न पडत आहे. महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटाने माजी आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याची शक्यता आहे महाविकास आघाडीतील इतर पक्षातील काहीजण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे जगताप यांचा विधानसभेत जाण्याा मार्ग आता खडतर झालेला आहे.
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. काॅंग्रेसनेते घनश्याम शेलार, शिवसेना नेते साजन पाचपुते आदींनी निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. त्यामुळे श्रीगोंंद्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. आगामी काळातही हीच परिस्थती राहणार असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
त्यातच साजन पाचपुते यांना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उमेदवारी देण्याचा शब्द दिलेला आहे. त्यामुळे साजन पाचपुते यांनीही मतदारसंघात चाचपणी सुरु केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सध्या तरी स्पर्धेत तीन जण दिसत असले तरी काही छुप्या पध्दतीने निवडणुकीची तयारी करीत असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
मागील महिन्यापासूनच महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी केल्याची चर्चा आहे. या चर्चेत आपम निवडणूक लढवावी, असा सल्ला कार्यकर्त्यांनी काही नेत्यांना दिलेला आहे. त्यामुळे या नेत्यांनी आता निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत.
त्यासाठी काही गावातील प्रमुख नेत्यांना बोलवून त्यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे. या चर्चेतून पुढील निर्णय घेण्याच्या नेत्यांनी हालचाली सुरु केलेल्या आहेत. त्यांच्या काय हालचाली व भूमिका राहते, याक़डे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
स्थानिक नेत्यांनी आता निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला किती मान मिळणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. वरिष्ठही आपल्या स्थानिक नेत्यांना माघार घ्यायला लावणार की लढायला ताकद देणार हे आगामी काळत स्पष्ट होईल.

Post a Comment