अहिल्यानगर : दिल्ली क्राइम ब्रँचमधून बोलतो आहे, तुम्हाला डिजिटल अटक करण्यात आली आहे, अशी धमकी देऊन महिला डॉक्टरची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिथिला निनाद गाडेकर (रा. विराज कॉलनी, नगर) असे फसवणूक झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२४ पासून सुरू होता. याप्रकरणी गुरुवारी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा गणवेश परिधान करून सायबर भामट्याने तक्रारदार यांना व्हॉट्सअॅप कॉल केला. त्याने मी दिल्ली क्राइम ब्रँचमधून बोलतो आहे, असे सांगून तक्रारदार यांना धमकी दिली.
तसेच तक्रारदार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून सायबर भामट्याने संदीप कुमार नावाने बँकेत बनावट खाते उघडले. त्यानंतर तुमच्या नावाने संदीप कुमार याचे बँकेत खाते असून, त्याच्या खात्यात मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे.
तो सध्या फरार झाला आहे. त्यास तुम्ही जबाबदार आहात. तुम्हाला डिजिटल अटक करण्यात आली आहे, अशी धमकी देत सायबर भामट्याने तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी १० लाख २६ हजार ऑनलाइन घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
Post a Comment