पुणे : बैलगाडा मालकाचे अपहरण करून खून केला. त्यानंतर मृतदेह जाळून विल्हेवाट लावून खंडणीचा बनाव केला. पिंपरी चिंचवड, पुणे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी गुन्ह्याची उकल करून संशयितास अटक केली.
मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे. पंडित रामचंद्र जाधव (५२, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे खून झालेल्या गाडामालकाचे नाव आहे. सूरज मच्छिंद्र वानखेडे (२३, रा. नवलाख उंब्रे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
सूरज याने त्याचा मित्र रणजित कुमार (रा. बिहार) याच्या मदतीने पंडित जाधव यांचे ५० लाखांच्या खंडणीचा बनाव करून अपहरण केले. वैयक्तिक कारणावरून त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर खेड तालुक्यातील वहागाव येथील डोंगरावर कारमधून मृतदेह नेला.
तेथे मृतदेह जाळून विल्हेवाट लावली. त्यानंतर कार घराच्या परिसरात लावली. तसेच त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअॅपवरून मेसेज करून ५० लाखांची खंडणी मागितल्याचा बनाव केला.
पंडित जाधव हे १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने तपास करताना तांत्रिक विश्लेषण केले असता सूरज याच्यावर संशय बळावला.
तो मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्याची उकल झाली. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.
Post a Comment