पारनेर : पक्ष पाहून मतदान करण्यापेक्षा त्या उमेदवाराचे मतदारसंघाबाबतचे नेमके व्हिजन काय आहे? हे पाहूनच मतदारांनी मतदान करावे. आपल्या गावात आलेल्या प्रत्येक उमेदवाराला केलेल्या कामांचा जाब विचारावा असे आवाहन पारनेर - नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी पारनेर-नगर मतदारसंघातुन उध्दव ठाकरे शिवसेनेकडुन उमेदवारी मागितली होती. मात्र शिवसेनेला डावलल्याने सेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण अपक्ष म्हणुन मैदानात उतरल्याचे त्यांनी जाहिर केले.
अहिल्यानगर तालुक्यामधील खंडाळा गावात समर्थकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पारनेर मतदारसंघ शिवसेनेच्या पाठिशी उभा राहणारा आहे. या मतदार संघाला संघर्षशिल आमदाराची गरज आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून आता पर्यत दूध प्रश्न, शेतीमालाच्या बाजार भाव, कांदा प्रश्न, वीज प्रश्न अशा विविध प्रश्नावर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी नगर तालुक्यात घोसपुरी योजनेसारखी पाणी योजना पथदर्शीपणे चालवून नफ्यात आणली.
यापुढे शेतकऱ्यांसाठी लढा उभा करण्यासाठी त्यांचे प्रश्न घेऊनच मी मैदानात उतरलो आहे. आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी शेतकरी, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केले याचा जाब त्यांना गावात प्रचाराला आल्यावर विचारावा.
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे पाठबळ असल्याने नगर-पारनेर मतदारसंघात परिवर्तनाची लाट उसळणार असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment