जामखेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझ्या मतदारसंघात प्रचार घेण्यासाठी सभा निमंत्रण दिले होते. मात्र, ते मुद्दाम आले नाहीत. माझ्या विरोधात हा नियोजित कट होता. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप आमदार राम शिंदे यांनी केला. यावेळी शिंदे यांना अश्रू अनावर झाले.
कराड (ता. सातारा) येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळावरून उपमुख्यमंत्री अजित पवार चालले होते. त्यावेळी अजित पवार व आमदार रोहित पवार समोरासमोर आले.
यावेळी अजित पवार म्हणाले, तू थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झाले असते. चल पाया पड, असे रोहित पवार यांना म्हणताच ते पाया पडले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
त्यानंतर आमदार राम शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार व रोहित पवार यांच्यावर टीका केली.
अजित पवार यांना माझ्या मतदारसंघात सभा घेण्यासाठी निमंत्रण दिले होते. मात्र ते मुद्दाम आले नाहीत. निवडणूक घोषित होण्यापूर्वीच त्यांच्यात कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता. कर्जत-जामखेडमध्ये माझ्या विरोधात नियोजित कट रचला गेला. हे आज उघडकीस आले आहे. महायुतीचा धर्म अजित पवार यांनी पाळला नाही.
माझा बळी देण्याचा प्रयत्न झाला. रोहित पवार व त्यांचे कुटुंबही बारामतीला मतदानाला गेले नाहीत, असा आरोप शिंदे यांनी केला.
फेरमतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज दिला होता. तो त्यांनी स्वीकारला. मात्र, त्याअगोदर त्यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर समोरचा उमेदवार विजयी घोषित केला. ही त्यांची चूक आहे. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment