मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ५ दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्री कोण याचा सस्पेन्स संपला नाही. यंदाच्या निवडणुकीत महायुतीला २०० हून अधिक जागांचे बहुमत मिळाले आहे.
मजबूत संख्याबळ असतानाही महायुतीकडून सरकार स्थापनेस दिरंगाई का होतेय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यात भाजपाकडून मुख्यमंत्रिपदावर दावा सांगण्यात आला आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदी-शाहांचा निर्णय मान्य असेल असे सांगून भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
शिंदे यांच्याकडून आलेल्या या प्रस्तावावर भाजपा सकारात्मक असल्याचं कळतंय. पडद्यामागे घडणाऱ्या या राजकीय हालचालींमुळे राज्यात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा लांबणीवर पडत आहे. ठाण्यातील पत्रकार परिषदेत शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली.
सत्तास्थापनेचे घोडे कुठेही अडलेले नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेले नाही. मी कुठलीही गोष्ट ताणून धरणारा माणूस नाही. मला इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख जास्त प्रिय आहे.
मला अडीच वर्षे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी आभारी आहे. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घ्यावा, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असे सांगून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला.
Post a Comment