कोपरगाव : 'साहेब.. माझ्या भावाचा खून झाला आहे. त्याचा मृतदेह पोत्यात घालून नेताना मी पाहिले आहे, त्याचा शोध घ्या', अशी खोटी माहिती डायल ११२ वर देणाऱ्याविरुद्ध कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिस स्टेशनच्या डायल ११२ च्या एमडीटी मशीनवर कॉल आला. शहरातील हनुमाननगर गेटजवळ माझ्या भावाचा खून झाला आहे. त्याचा मृतदेह सापडत नाही, तरी तत्काळ पोलिस मदत पाठवा.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके, पो.कॉ. धोंगडे, साळुंके यांना हनुमाननगर येथे पाठविले.
पोलिस तेथे गेल्यावर फोन करणाऱ्यास मोबाइलवर संपर्क केला, परंतू तो मोबाइल उचलत नव्हता. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे विचारपूस केली. तेव्हा येथे खुनाची घटना घडली नसल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी संबंधिताला वारंवार फोन केले, त्यानंतर संपर्क झाला. त्याला पोलिसांनी गाठले, तेव्हा फोन करणारा परशराम रावसाहेब दिवे (वय ३१, रा. सर्व्हे नंबर १०५, हनुमाननगर, कोपरगाव) असल्याचे निष्पन्न झाले.
परशरामने सांगितले की, माझा सावत्रभाऊ संतोष आडांगळे याचा पहाटे तीन वाजता खून झाला आहे. त्याचा मृतदेह माऊ पवार याने गोणीत घालून घेऊन जाताना मी पाहिले आहे.
त्यानंतर पोलिसांनी परशराम दिवे याची पत्नी रत्नमाला दिवे हिच्याशी संपर्क केला. तेव्हा तिने संतोष आडांगळे यांचा मोबाइल क्रमांक पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क केला तेव्हा, मी जिवंत आणि सुरक्षित असल्याचे आडांगळे यांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांना खात्री झाली की, परशराम दिवे याने कुठलीही घटना घडलेली नसताना त्रास देण्याच्या उद्देशाने डायल ११२ वर खोटी माहिती दिली. त्यानंतर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात परशराम दिवे विरूद्ध भा.न्या.सं. २०२३ चे कलम २१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment