मुंबई :काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. त्यांना १०४ डिग्री फॅरनहिट ताप असल्याचे समजते. सर्दी, खोकल्याचाही त्रास आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. त्यांची रक्त तपासणीही करण्यात आली.
काळजीचे कारण नाही, त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे पथक तैनात केले आहे, असे सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील वैद्यकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी सांगितले.
माजी मंत्री व शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दरे गावी गेले होते. मात्र, शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने ते न भेटताच मुंबईला परतले.
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का व तिन्ही घटकपक्षांमध्ये मंत्रिपदांचे वाटप कसे होईल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
भाजप आणि शिंदेसेना या दोन मित्रपक्षांमध्ये गृह खात्याच्या वाटपासह काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मंत्रिपदाच्या वाटपाबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. भाजप व शिंदेसेना दोघांनाही गृह खाते हवे आहे.
Post a Comment