नेवासा ः दारू पित असताना झालेल्या किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी मारून त्याचा खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह प्रवरासंगम (ता. नेवासा) येथील नदीपात्रात टाकून दिल्याची घटना घडली आहे.
कल्याण देविदास मरकड (रा. तिसगाव ता. पाथर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिसगाव येथील तिघांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
4 नोव्हेंबर रोजी प्रवरासंगम शिवारात एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता 1 नोव्हेंबर रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल असलेल्या कल्याण देविदास मरकड यांचा हा मृतदेह असल्याचे समोर आले.
मयत कल्याण यांच्या डोक्यात हत्याराने जखम झाल्याने त्यांचा खून झाल्याचे समोर आले. 1 नोव्हेंबर रोजी कल्याण हे पंकज मगर, इरशाद शेख यांना भेटण्यासाठी गेले असल्याने त्यांनीच कल्याणचा खून केल्याचा संशय कल्याणचा भाऊ प्रसाद भास्कर मरकड (रा. तिसगाव) यांनी व्यक्त केला. तशी फिर्याद त्यांनी 5 नोव्हेंबर रोजी नेवासा पोलीस ठाण्यात दिली होती.
कल्याणचा मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार सुरेश माळी, संदीप पवार, संतोष लोढे, शरद बुधवंत, संतोष खैरे, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, अर्जुन बडे, अरूण मोरे यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यांनी तिसगाव येथील घटनास्थळी भेट दिली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींची ओळख पटविली. संशयित आरोपी निवडुंगे शिवारात असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासकामी त्यांना नेवासा पोालिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Post a Comment