लंघे- खताळमध्ये कोणाला मिळणार मंत्रीपदाची संधी

अहिल्यानगर ः महायुतीने जिल्ह्यात घवघवीत यश मिळविलेले आहे. या यशात शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार विजयी झालेले आहेत. सध्या राज्यात मंत्रिमंडळ स्थापनेच्या हालचाली सुरु झालेल्या असून जिल्ह्यात मंत्रिपद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे. भाजप व अजित पवार गटाला प्रत्येकी एक मंत्रीपद मिळणार आहे. तशीच शिंदे गटाकडूनही एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


जिल्ह्यात अजित पवार गटाचे चांगले वर्चस्व आहे. तसेच भाजपची पाळेमुळे ग्रामीण भागात पोहचलेली आहे. शिवसेना शिंदे गटाचा विस्तार होणे बाकी आहे जिल्ह्यात आपली ताकद वाढविण्यासाठी शिंदे गटातील आमदार अमोल खताळ किंवा आमदार विठ्ठलराव लंघे यापैकी एकजणाला संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विजय रथ रोखला आहे. त्यामुळे त्यांना संधी द्यावी, अशी मागणी संगमनेर तालुक्यातून होत आहे. याबाबत संगमनेर तालुक्यातील शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेऊन त्यांना मागणी करणार आहे. खताळ हे तरुण तडपदार आमदार आहेत. त्यामुळे ते जिल्ह्यात तरुणांचे संघटन बांधणी मोठ्या प्रमाणात करतील. त्यामुळे त्यांनाच संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

विठ्ठल लंघे यांनी विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचा पराभव करून विजय मिळविलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल लंघे यांना मंत्रीपदाची संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लंघे यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाची धुरा संभाळलेली आहे. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात चांगला संपर्क असून या संपर्काचा फायदा शिंदे गटाला जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे लंघे यांनाच संधी द्यावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

लंघे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षत्रपद संभाळलेले आहेत. त्यांचा जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांशी संपर्क आलेला आहे. त्यामुळे पक्ष बांधणीसाठी त्यांना मंत्रीपदाची संधी दिल्यास त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. तसेच जिल्ह्यात महापालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीसह नगरपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकातही लंघे यांना मंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर निश्चित फायदा होणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

नेवासा व संगमनेर तालुक्याला मंत्रीपदाची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नेवासा व संगमनेर तालु्क्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याच तालुक्याला मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post