मुंबई : शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिला व त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दलची साशंकता शपथविधीच्या अडीच तास आधी दूर झाली. तोपर्यंत राजकीय गोंधळ सुरुच होता.
अडीच वर्षे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय आपल्याला मान्य असेल असे आधीच जाहीर केले होते. मात्र स्वतः ते उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही, याबाबतची अनिश्चितता गुरुवारी दुपारपर्यंत कायम होती. शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दोनवेळा शिंदे यांची 'वर्षा'वर जाऊन भेट घेतली व त्यांनी मंत्रिमंडळात यावे यासाठी आग्रह धरला होता. दुपारी शिंदे गटाच्या सर्व माजी मंत्र्यांनी शिंदेंची भेट घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही तर आम्हीही मंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यानंतर शिंदे हे राजी झाले.
या सगळ्या घडामोडीनंतर शिंदेसेनेचे नेते उदय सामंत, भरत गोगावले, राहुल शेवाळे हे मनोनित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यानंतर ते राजभवनावर गेले व शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचे फडणवीस यांचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. त्यानंतर शपथविधी कार्यक्रम झाला आहे.
काहीही असले तरी शिंदे यांना काही निर्णय मान्य नाहीत. त्यामुळे आगामी काळात हे सरकार टिकेल की मध्येच कोसळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment