संगमनेर : काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीसाठी राज्यभरातून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने संगमनेरमध्ये दाखल होत आहेत.
विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकालाने राज्यभरात सर्वत्र मोठी हळहळ निर्माण झाली. यानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात हे मुंबई येथे काँग्रेस कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित राहिले.
यानंतर तातडीने दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी ते उपस्थित होते. त्यानंतर ते शनिवारी रात्री उशिरा संगमनेर शहरात आले.
यानंतर सकाळीच आमदार थोरात यांनी तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन भेटी दिल्या. तर गुंजाळवाडी येथील शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या राजवीर बाळासाहेब जाधव यांच्या जाधव कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
यानंतर लोकनेते आमदार थोरात यांच्या भेटीसाठी अकोला,बाळापूर, जळगाव,चोपडा, अहमदनगर, नाशिक, ठाणे ,सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, शिर्डी, वैजापूर तसेच भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याचबरोबर शैक्षणिक, साहित्य व समाजकारणात निरपेक्ष भावनेने काम करणारे विविध संघटनांचे पदाधिकारी भेटीसाठी आले होते.
यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले की, सर्वांसाठी विधानसभेचा निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनिय आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यभर केलेले पारदर्शक आणि लोकाभिमुख काम यामुळे त्यांचे नेतृत्व हे राज्यातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.
याचबरोबर सततच्या रचनात्मक कामातून उभा केलेला संगमनेर तालुका आणि संस्कृत राजकारणाची पद्धत ही महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणारी आहे. संगमनेर तालुका जसा हळहळला तसा संपूर्ण महाराष्ट्र दुःखी आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये नव्या जोमाने तालुका पुन्हा राज्याचे नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साहित्य व समाजकारण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आपण सदैव यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जोपासला आहे. या पुढील काळात महाराष्ट्राला आपल्यासारख्या सुसंस्कृत नेतृत्वाची गरज असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
यावेळी विविध कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावागावातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने कारखाना अतिथी गृह व सुदर्शन निवासस्थान, यशोधन या विविध ठिकाणी भेटीसाठी उपस्थित होते.
आज दिवसभर राज्यभरातील कार्यकर्त्यांसह तालुक्यातील अनेक नागरिकांची मोठी वर्दळ आमदार बाळासाहेब थोरात यांच्या भेटीसाठी उपस्थित होती.
Post a Comment