अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही. मी महसूलमंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव माझ्यासमोर आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात, हेच कळत नाही, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
मंत्री विखे म्हणाले, राज्य सरकारसमोर अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा कोणता प्रस्ताव आलेला नाही. मी महसूल मंत्री असतानाही असा कोणता प्रस्ताव नव्हता. मात्र, असे असताना जिल्हा विभाजनाच्या चर्चा कोण उडवते हेच कळत नाही.
केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘हर घर जल योजने’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. या कामात काही त्रुटी, उणीवा असून शकतात. यामुळे या योजनेत भष्ट्राचार झाला, असा आरोप करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
विखे म्हणाले, राज्यातील जनतेने पाणी पुरवठा विभागासाठी मंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ते या विभागाचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहेत. मात्र काही लोकांना कामच राहिले नाही. यामुळे ते जनतेमध्ये राहण्यासाठी ओढून-ताणून आरोप करत आहेत.
जनतेने त्यांना नाकारलेले असून त्यांचा कार्यकाळ आता संपत आला असल्याची टीका मंत्री विखे पाटील यांनी खासदार लंके यांच्यावर केली.
Post a Comment