कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदासाठी सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत होती. यावेळी सभापती राम शिंदे गटाकडून सत्तेतून बाहेर पडलेल्या काँग्रेसच्या रोहिणी सचिन घुले यांचा तर आमदार रोहित पवार गटाकडून प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांनी नगराध्यक्षा पदासाठी प्रत्येकी दोन असे एकूण ४ अर्ज दाखल केले.
सदरचे चार ही अर्ज छाननी प्रक्रियेत वैध असल्याची माहिती कर्जतचे प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी दिली. भैलुमे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडीत ट्विस्ट आला आहे.
कर्जत तत्कालीन नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांच्या रिक्त झालेल्या जागेवर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी नूतन नगराध्यक्षा निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्या अनुषंगाने सोमवारी कर्जत नगरपंचायतीच्या सभागृहात मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्याकडे नगराध्यक्षा पदासाठी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत होती.
कर्जत नगरपंचायतीच्या या निवडीकडे मतदारसंघासह राज्याचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी गटात पदाधिकारी निवडीने असंतोष उफाळून आल्याने आमदार रोहित पवारांच्या सत्तेला त्यांच्याच गटाच्या ११ नगरसेवकांनी सुरुंग लावला. सभापती प्रा राम शिंदेंबरोबर घरोबा केला. त्यामुळे राम शिंदेंकडे भाजपासह एकूण १३ नगरसेवकांची संख्या झाली.
कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्षा पद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने कोणाच्या नावाची वर्णी लागते याकडे कर्जतकरांचे लक्ष होते. विद्यमान उपनगराध्यक्षा असणारे रोहिणी सचिन घुले यांचा एकमेव अर्ज १३ नगरसेवकांकडून नगराध्यकक्षा पदासाठी सोमवारी दाखल करण्यात आला. रोहिणी घुले यांच्या अर्जावर सूचक म्हणून भास्कर भैलुमे तर अनुमोदक संतोष मेहेत्रे यांच्या स्वाक्षरी आहेत.
तत्पूर्वी आमदार रोहित पवार गटाकडून माजी नगराध्यक्षा असलेल्या प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांनी देखील अर्ज दाखल केला. भैलुमे यांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक नामदेव राऊत यांची तर अनुमोदक म्हणून उषा राऊत यांची स्वाक्षरी आहे.
प्राप्त चार ही नामनिर्देशन पत्राची दुपारी २ वाजता प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छाननी प्रक्रिया पार पडली. यात रोहिणी घुले यांच्या नामनिर्देशन पत्रावर नगरसेवक नामदेव राऊत यांनी हरकत घेतली होती.
मात्र प्रांताधिकारी पाटील यांनी सदरची हरकत फेटाळून लावत नगराध्यक्षा पदाचे चार ही अर्ज वैध असल्याची माहिती पत्रकारांना दिली. मंगळवारी चार वाजता नगराध्यक्षा पदाचे वैध असलेले नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची अंतिम मुदत असणार आहे. भैलुमे ऐनवेळी अर्ज माघारी घेणयाची शक्यता आहे.
..................
Post a Comment