कर्जत ः कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावर आता चर्चेला उधाण आलेले आहेत. रोज एकाचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे राऊत यांच्याविरोधात बंड केलेल्या नगरसेवकांमध्ये पदावरून एकमत होत नसल्याची चर्चा सध्या कर्जत तालुक्यात सुरु आहे.
माजी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात १३ नगरसेवकांनी बंड केलेला आहे. या बंडातून सर्व नगरसेवकांनी राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालाचाली केल्या होत्या. परंतु राऊत यांनी आपला राजीनामा दिल्याने अविश्वास ठरावाची वेळ आलेली नाही. विरोधकांनी राऊत यांना नामोहरण करण्याचा खेळलेला डाव असफल झालेला आहे.
फक्त राऊत यांना पाय उतार व्हावे लागले. परंतु राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा जो घाट घातला होता. त्यात सर्वांना अपयश आलेले आहे. यावरूनच विरोधकांमध्ये राजकीय डावपेच टाकण्याची क्षमता कमी असल्याची चर्चा सध्या कर्जत तालुक्यात सुरु आहे. राऊत यांना अविश्वास ठराव आणऊन पाय उतार करणे महत्वाचे होते. त्यातच विरोधकांचा खरा विजय होता. परंतु विरोधकांनी टाकलेला डाव अयशस्वी झालेला आहे. यावरून राऊत यांचे विरोधक चितपट झालेले आहेत.
राऊत पायउतार झालेल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बंडखोरी केलेल्या नगरसेवकांना आपल्याच नगराध्यक्षपदाची संधी मिळेल, अशी आशा लागलेली आहे. त्यामुळे २८ तारखेला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून दोन मे रोजी नगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे.
सध्या नगराध्यक्षपदासाठी काॅंग्रेसमधून रोहिणी घुले व मोनाली तोटे इच्छूक आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून चार नगरसेवक इच्छुक आहेत. त्यातील एकाला संधी मिळणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून ताराबाई कुलथे, छाया शेलार, ज्योती शेळके, लंका खरात यांची नावे चर्चेत आहेत यामधील कुलथे या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या असल्या तरी त्या घुले समर्थक आहेत. त्यामुळे त्यांनी जवळजवळ माघार घेतल्यात जमा आहे. सध्या शेलार, शेळके व खरात यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. भाजपकडून मोहिनी पिसाळ यांचे नाव चर्चेत आहे. त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सहा इच्छुकांमधून एका इच्छुकाची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. त्यामुळे या सहा इच्छुकांमध्ये कोणाचे पारडे जड ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा अद्याप सादर झालेला नाही. त्यामुळे उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. आपल्याला संधी मिळणार नाही, अशीच चर्चा त्या नगरसेवकांमध्ये सुरु आहे. आपल्या संधी मिळणार नव्हती तर आपण हा बाहेर पडण्याचा उद्योग मग का केला असा सवाल आता ते उपस्थित करीत आहेत.
राऊत यांना पाय उतार केल्याचे समधान सर्वांना असले तरी पदे वाटप करण्याचे कठीण काम नेत्यांपुढे आहे. हे काम करत असताना त्याची वाटणी कशी करायची हा प्रश्न नेत्यांपुढे असून काहींनी आगामी काळात लक्ष देऊन पद देण्याचे आश्वासनांची खैरात सध्या वाटप केली जात असल्याची चर्चा सध्या कर्जत तालुक्यात सुरु आहे.
Post a Comment