अहिल्यानगर ः अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज भाजप जिल्हाध्यक्षपदी जुन्याच कारभार्यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग, तर उत्तरेच्या जिल्हाध्यक्षपदी नितिन दिनकर यांची निवड झाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबुत करण्यावर भर दिला. प्रत्येक शहर व जिल्ह्याती सदस्य संख्या वाढविण्यात आली. त्याचबरोबर मंडलाध्यक्ष यासारख्या पदांच्याही निवडी करण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीला मोठे यश मिळाल्याने भाजपच्या या पक्ष वाढीला अधिक बळ मिळाले आहे.
जिल्ह्यात उत्तर- दक्षिण व शहर असे तीन जिल्हाध्यक्षांची पदे आहेत. या पदांच्या निवडीसाठी काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात मतदान घेण्यात आले होते. त्यातून तिन्ही जिल्हाध्यक्ष पदांसाठी अनेक नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे गेली होती.
दक्षिणेतून विद्यमान जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांंच्यासह अशोक खेडकर, सचिन पोटरे, बाळासाहेब महाडिक, संतोष म्हस्के आदींची नावे चर्चेत होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी विद्यमान जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याच गळ्यात पुन्हा माळ टाकली. तर उत्तरेतून देखील दिनकर यांनी पुन्हा संधी देण्यात आली आहे.
पूर्वी भाजपचे व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत (शिंदे गट) जाऊन आमदार झालेले विठ्ठल लंघे यांच्याकडे उत्तरेचे जिल्हाध्यक्षपद होते. त्यानंतर दिनकर यांनी हे पद सांंभाळले. त्यामुळे पक्षाने दिनकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे.
शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय पक्षाने प्रलंबित ठेवला आहे. या पदासाठी विद्यमान अध्यक्ष ॲ. अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महेंद्र गंधे, सचिन पारखी आदी इच्छुक आहेत. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीकडे शहराचे लक्ष लागलेले आहे.
Post a Comment