पाथर्डी : खाजगी व्यक्तीमार्फत लाच स्वीकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र वैद्यकीय तपासणीसाठी नेलेल्या आरोपीमार्फत पोलिसाने लाच स्वीकारल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (ता. १७) घडला. .
लक्ष्मण सुखदेव पोटे (वय ३५) असे अटक केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. पोलिस नाईक रामदास जयराम सोनवणे हा फरार झाला असून, याप्रकरणी पैसे स्विकारल्याने आरोपी राहुल शिवाजी साबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
तक्रारदार यांचे पाथर्डी येथे मिसळपावचे हॉटेल आहे. ते रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने हॉटेलवर कारवाई करावी लागेल.
कारवाई नको असेल तर महिना दोन हजाराचा हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी पोलिस शिपाई पोटे याने तक्रारदार यांच्याकडे केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या पथकाने रविवारी पडताळणी केली. त्यात तडजोडीअंती दीड हजार रुपये हप्ता सुरू करण्याचे ठरले. हप्त्याची रक्कम मंगळवारी देण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी पोटे यास फोन केला, तेव्हा पोटे हे आरोपी साबळे यास वैद्यकीय तपासणीसाठी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आले होते. त्याने तक्रारदार यांना उपजिल्हा रुग्णालयात बोलावून घेत तिथे आरोपीकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. आरोपीने ती स्वीकारली.
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी लाचखोर पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Post a Comment