पारनेर : पळसपूर (ता. पारनेर) परिसरात मुळा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणार्या ढंपरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत 20 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. वाहन मालक मात्र पसार झाला आहे.
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार व भगवान थोरात यांचे पथक गुरूवारी (26 जून) पारनेर पोलिस ठाणे हद्दीत अवैध वाळू उपशाची माहिती काढत असताना, पथकाला माहिती मिळाली की देसवडे येथून पळसपूरच्या दिशेने एक इसम मुळा नदीतून वाळू उपसा करून ती चोरून वाहून नेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पळसपूर गावच्या शिवारातील महावितरण कंपनीच्या सबस्टेशनजवळ सापळा रचला. काही वेळातच एक संशयास्पद ढंपर वाहन त्या मार्गावरून येताना दिसल्याने त्याला थांबवण्यात आले. वाहन चालकास पोलिसांनी विचारणा केली असता त्याने आपले नाव राहुल कुंडलीक भाईक (वय 33, रा. कातळवेढा, ता. पारनेर) असे सांगितले.
वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात वाळू भरलेली आढळली. राहुलकडे वाहन मालकाबाबत चौकशी केली असता, हे वाहन उल्हास भाऊसाहेब दरेकर (रा. देसवडे, ता. पारनेर) याचे असल्याचे त्याने सांगितले.
मात्र उल्हास हा सध्या पसार आहे. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. त्यावर कारवाईची मागणी होत आहे.
Post a Comment