जामखेड : शेतातील सामाईक पाइपलाइन फुटल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील भुतवडा येथे दोन पुतण्यांनी विळा व दगडाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मयताची पत्नी रंजना बळीराम राळेभात (रा. राळेभात वस्ती, भुतवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हनुमंत सखाराम राळेभात व योगेश सखाराम राळेभात (रा. राळेभात वस्ती, भुतवडा) या दोन पुतण्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीचे पती व दीर या दोन भावा-भावांमध्ये शेतीचा वाद सुरू आहे. मागील एक वर्षापासून या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल आहे. शुक्रवारी (ता.२७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी हनुमंत सखाराम राळेभात व योगेश सखाराम राळेभात हे शेतात आले व सामाईक असलेली पाण्याची मोटार चालू करू लागले.
यावेळी त्यांचे मयत चुलते बळीराम राळेभात यांनी तुम्ही अगोदर आमच्या शेतात जी पाइपलाइन फुटली आहे, ती दुरुस्त करा व मगच पाण्याची मोटार चालू करा, असे म्हणाले. मात्र, असे म्हणल्याचा राग आल्याने आरोपी पुतण्या हनुमंत सखाराम राळेभात याने शेतातील विळा घेऊन आपल्या चुलत्यास म्हणाला, की मी जेलमध्ये जाईल.
पण तुला सोडणार नाही, असे म्हणून विळ्याने हातावर, पोटावर व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले, तसेच दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या हातावर देखील विळ्याने वार करून जखमी केले. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत, तर त्या दोघांनी त्या ठिकाणचा दगड उचलून फिर्यादी पतीच्या तोंडावर मारून जखमी केले.
या घटनेत दोघे चुलता व चुलती गंभीर जखमी झाल्याने, त्यांना जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बळीराम राळेभात यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, शनिवारी सकाळी गंभीर जखमी झालेले बळीराम राळेभात यांचा अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांना शनिवारी खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी जखमीचा मृत्यू झाला असल्याने पुन्हा या घटनेत दोन जणांविरोधात खुनाचा गुन्हा समाविष्ट करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.
Post a Comment